हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला असून अनेक खात्यांमध्ये उलथापालथ केली गेली आहे. तब्बल 12 मंत्र्यांचे राजीनामे मोदींकडून घेण्यात आले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात ठेवलं आहे अशा शब्दांत नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.
मोदींच्या मंत्री मंडळातून चांगलं काम करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. संजय धोत्रे हे चांगलं काम करत होते. त्यांनाही मंत्रिमंडळातून काढलं आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना ठेवलं आहे असे नाना पटोले यांनी म्हंटल तसेच डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता असेही ते म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाकाळामध्ये गंभीर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी स्वतः पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच मंत्रिमंडळात कोणालाही भेटलं तरी सर्व कारभार हा पंतप्रधान कार्यालयातून चालणार असल्याने त्याने काही फरक पडत नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.