छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, राज्यपालांनी जाहीर माफी मागावी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांचा खरपूस समाचार घेतानाच भाजपवरही सडकून टीका केली आहे . राज्यपालांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच छत्रपतींचा अपमान होत असताना भाजप नेते गप्प का आहेत असा थेट सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले, समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते तरीही काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करून समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांत जाणीवपूर्वक केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे. भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तींना राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे, असेही ते म्हणाले.

भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ मताची पोळी भाजण्यासाठी वापर करतो असा आरोप नाना पटोले यांनी केला. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गप्प कसे बसतात असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला.

Leave a Comment