काँग्रेस विधानसभा स्वबळावर लढवणार? नाना पटोलेंच्या विधानाने ‘मविआ’त खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचे आपण बघितलं. यामध्ये सर्वाधिक १३ जागा काँग्रेसला (Congress) मिळाल्याने त्यांचा उत्साह सुद्धा वाढला आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकसंघ राहून निवडणुकीला सामोरे जाणार का असा प्रश्न असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या एका विधानाने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. काँग्रेस विधानसभेसाठी सर्वच्या सर्व २८८ जागांसाठी तयारी करत आहे असं नाना पटोले यांनी म्हंटल आहे. ते भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले यांनी त्यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु केल्यात. गावातील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांना साकोलीबाबत विचारलं असता, साकोलीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही महाविकास आघाडीत राष्ट्रवादी सर्वात जास्त जागा लढवेल असं म्हंटल होते. त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. वायबी चव्हाण सेंटर वर होणाऱ्या या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा होते ते पाहायला हवं.