‘मोदींच्या लेखी अदानी, अंबानी गरीब’; संसदेतील अश्रू हे मगरीचे अश्रू; नाना पटोलेंची शेलकी टीका

नागपूर । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मोदी हे नटसम्राट आहेत. राज्यसभेत भावूक झाल्याचं दाखवत होते. मात्र, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावेळी ते भावूक झाले नव्हते, अशी शेलकी टीका पटोले यांनी मोदींवर केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन पटोले यांनी मोदींना हा जोरदार टोला हाणलाय.

मोदी यांचे राज्यसभेतील अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, ते देशातील जनतेला माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का? असा सवालही नाना पटोले यांनी केलाय.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि पहिल्यांदा लोकसभेत आले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर माथा टेकला होता. आपण देशातील गरीब जनतेसाठी काम करणार असल्याचं त्यावेळी मोदींनी सांगितलं होतं. पण आता देशात अदानी आणि अंबानी हेच गरीब असल्याचं वाटत आहे, अशा टोलाही पटोले यांनी मोदींना लगावला आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like