आता कितीही दबाव आणला तरी आघाडी सरकार झुकणार नाही; पटोलेंचा भाजपवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. आता त्याला काहींकडून वाचवले जात आहे. भाजपने आता बंदसाठी किती दबाव आणला तरी आघाडी सरकार झुकणार नाही, असे पटोले यांनी म्हंटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजप व केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना बेकायदेशीर ताब्यात ठेवले अन् नंतर अटक केली. लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे. हे आता चालू देणार नाही.

आम्ही शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्यासाठी आजचे महाराष्ट्र बंदचे आंदोलन करीत आहोत. त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. मात्र, भाजप सरकारकडून शेतकऱयांवर अन्याय केला जात आहे. स्ववसामान्य व्यापाऱयांना जीएसटीच्या माध्यमातून लुटण्याचे काम त्यांची लुबाडणूक करण्याचे काम भाजप कडून केले जात आहे. यांच्या विरोधात आज महाविकास आघाडी सरकारने आक्रमक पावित्रा घेतला असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment