ओबीसी आरक्षण: केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेसकडून 26 जूनला राज्यव्यापी आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकार विरोधात 26 जुन ला जेलभरो आंदोलन पुकारल्या नंतर आता काँग्रेस ने देखील केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याच ठरवलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत घोषणा केली. राज्यातील भाजप आणि विरोधी पक्षनेते आरक्षणाच्या प्रश्नावर खोटे बोलत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे,’ असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं पटोले यांनी घोषित केलंय.

देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली, पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे असे नाना पटोले यांनी म्हंटल.

Leave a Comment