बरं झालं स्वामी बोलले, आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता’; यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असताना आता केंद्र सरकारने हि गोष्ट फेटाळली आहे. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीच भाजपला घरचा आहेर दिल्यानंतर काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या , भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केंद्र सरकारची पोलखोल केली. यानंतर केंद्र सरकारने सत्य लपवण्याऐवजी ते सर्वांसमोर आणावं. सुब्रमण्यम स्वामी यांच्याच मागणीचा भाजपने तातडीने विचार करून देशासमोर सत्य उघड करावं. स्वामी यांनी मागणी केल्याने आता सुंठीवाचून खोकला गेला असं म्हणावं लागेल. अन्यथा, काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी याबाबत मागणी केली असती तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करायला सरकारने मागेपुढे पाहिले नसते, असा टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.

सुब्रमण्यम स्वामी नेमकं काय म्हणाले-

लपवण्यासारखं काही नाही, तर मोदी यांनी इस्राईलला विचारून पेगासस प्रकरणी कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यावी आणि ती उघड करावी असं आव्हानच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिलं आहे. पेगॅसस स्पायवेअर ही एक व्यावसायिक कंपनी आहे. ती दिलेल्या कंत्राटानुसारच काम करते. त्यामुळे त्यांना भारतातील लोकांवर पाळत ठेवण्यासाठी कोणी किती पैसे दिले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टींमागे भारत सरकार नाही तर मग कोण? हे भारतीय जनतेला समजणे आवश्यक आहे’, असे सुब्रहमण्यम स्वामी यांनी म्हटलं.

Leave a Comment