औरंगाबाद | येथील समर्थनगर भागातील सहजीवन कॉलनीत रहिवाशांच्या नळाला मागील तीन महिन्यांपासून ड्रेनेजचे दूषित पाणी येत आहे. नागरिकांनी मनपा प्रशासन पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडे वेळोवेळी तक्रार केली. पण त्याची कोणी दखल घेतली नाही. दरम्यान मनपा प्रशासन यांना निवेदन दिले असता त्यांनी अभियंत्यांना दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
कोटला कॉलनी जलकुंभवरून 150 मीटर व्यासाच्या जलवाहिनीतून या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. तापडिया टेरेस, आय एम एम हॉल, पोलीस मोटार वाहन दुरुस्ती केंद्राची आणि पोलिस कॉलनीची ड्रेनेज लाईन सहजीवन कॉलनीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागूनच आहे. ती वारंवार लिकेज होते आणि चेंबरचे मेन हॉल भरताच त्यातील पाणी जलवाहिनीला मिसळते.
या भागातील नागरिक विश्वास कुलकर्णी, सुहासिनी बोरीकर, सत्यनारायण क्षेत्रीय, पंडितराव कुलकर्णी, सुलोचना चौधरी,शिरीष तांबे, राजेंद्र मुद्दा खेडकर, वसंत मेंढेकर, सरोज पेडगावकर, यांनी मनपा प्रशासन काकडे आपल्या मागण्या मांडल्या. प्रशासकांनी कार्यकारी अभियंत्यांना बोलून नागरिकांची अडचण लक्षात घेत दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या मात्र प्रशासकाच्या आदेशानंतरही दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.