सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे राष्ट्रपतींबाबत वादग्रस्त वक्तव्य; तर भाजकडून काँग्रेसवर पलटवार..

0
2
President
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या संसदेतील अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपतींच्या भाषणाबाबत बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, “त्या एक गरीब महिला आहेत, भाषणानंतर त्या थकल्या होत्या.” त्याचबरोबर, द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाला राहुल गांधी यांनी कंटाळवाणे म्हणले. या दोघांच्या वक्तव्यावरूनच राजकिय वातावरण तापले आहे.

या सर्व वादात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोनिया गांधींच्या विधानाचा निषेध करत काँग्रेसला ‘आदिवासी विरोधी’ म्हणले आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, “भारताच्या राष्ट्रपतींविषयी ‘गरीब’ हा शब्द वापरणे अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेस जाणूनबुजून गरीब आणि आदिवासी विरोधी विचारसरणी पुढे रेटत आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल राष्ट्रपती आणि आदिवासी समाजाची माफी मागावी.”

त्याचबरोबर, केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांनीही सोनिया गांधींच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रपती मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या आदिवासी महिला आहेत. अशा महिलेबाबत असे विधान करणे हा अपमान आहे.” तर, भाजप खासदार संबित पात्रा यांनीही सोनिया गांधींवर निशाणा साधत त्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांनी राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका करताना सरकारवर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, “सरकार राष्ट्रपतींना आपल्या सोयीनुसार बोलायला लावते. भाषणातून दाखवले जाणारे चित्र आणि वास्तव यामध्ये मोठा फरक असतो. आम्ही अभिभाषणावरील चर्चेदरम्यान आमची भूमिका स्पष्टपणे मांडू.”