सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने लाखो भाविक प्रस्थान करत असतात तसेच अनेक ठिकाणांहून पायी दिंडी निघतात. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांसाठी असलेल्या वाहनांना टोलमाफी दिली जाते. परंतु साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावरील टोल प्रशासनाचा मनमानी कारभार पुन्हा पहायला मिळाला. वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या गाड्यांना आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी टोलमाफी नाकारल्याने टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, वारकऱ्यांची दिंडी सातारा जिल्ह्यातील हद्दीतील आनेवाडी टोलनाक्यावरून निघाली होती. यावेळी टोलनाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी वारकऱ्यां अडवली. त्यांच्या वाहनांना अडवल्यानंतर टोल भरण्यास सांगितले. त्यावेळी वारकरी आक्रमक झाले. यावेळी वारकरी आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीवेळ वादावादी झाली.
यामुळे टोलनाक्यावरील वातावरण चांगलेच तापले. या घटनेची माहिती यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वारकऱ्यांशी चर्चा करीत मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली.