ग्रामीण पोलिस दलात वाहनांचा ताफा दाखल; पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले लोकार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | ग्रामीण पोलिस दलामध्ये जिल्हा नियोजन व विकास निधीतून 6 स्कार्पिओ, 87 मोटारसायकल आणि सात बोलेरोंचा समावेश झाला आहे.  या वाहनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमता, गतिमानतेत अधिक वाढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ स्टेडिअमवर पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा पर‍िषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, पोलिस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

पोलिस दलातर्फे डायल 112 प्रकल्पातील वाहने, महिला बीट मार्शल, आरसीपी प्लॅटून यांच्या पथसंचलनास पालकमंत्री देसाई यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनांचे लोकार्पण केले. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य देण्यात येते. यातून विविध योजनांना मंजुरी देण्यात येते. यापूर्वी शहर पोलिसांसाठी देखील वाहने उपलब्ध करून देण्यात आली. आता ग्रामीण भागातील पोलिस दलास वाहने उपलब्ध करून देण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांच्या गस्तीने गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरेल. तर शिस्तप्रिय नागरिकांना दिलासा मिळेल. गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी वाहनांचा अधिक उपयोग होईल. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांवरील होणाऱ्या गुन्ह्यांवर महिला बीट अंमलदारांमुळे वचक बसेल. सुसज्ज अशा स्वरूपाची वाहने उपलब्ध झाल्याने पोलिस गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करतील. गुन्ह्यांवर नियंत्रण आणतील, असा विश्वास व्यक्त करत कोविड 19 च्या कालावधीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक देसाई यांनी केले.

ग्रामीण पोलिसात दाखल झालेल्या वाहनांची उपयुक्तता, ग्रामीण भागातील महिला बीट अंमलदार यांचे कार्य, पिंक मोबाईल, एमइआरएस (मर्स) बाबत श्रीमती पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासन सर्वोतोपरी धीर देण्यास समर्थ आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला व शेवटी पोलिस दलाने देसाई यांना मानवंदना दिली.

Leave a Comment