औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने स्वयंप्रेरणेने आपली सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, असे आवाहन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या संघटनांच्या प्रतिनिधी सोबत असलेल्या कोरोना लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
या बैठकीत जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरण प्रमाण, उपलब्ध बेडची संख्या ही समाधानकारक असून जिल्ह्यातून कोरोना हद्यपार करण्यासाठी प्रत्येक संघटनेने स्वयंप्रेरणेने सामाजिक जबाबदारी ओळखून काम करावे. कोरोना हे देशावरील एक संकट असल्याने समन्वयाने व सहकार्याने कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण आणि जाणिव जागृती प्रत्येक गावागावात करावी. तसेच सारी आजाराच्या आणि टीएलआय सर्वेक्षण व तपासणीच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकसहभागातून कोरोना संकटावर मात केली पाहिजे. जसा यापूर्वी साथरोग निर्मूलनात आरोग्य यंत्रणा आणि लोकसहभागातून आपण विविध आजारांवर मात केली आहे. तसाच प्रतिसाद आत्ताच्या काळात असावा असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.
चांगल्या कामातून सर्वांना सकारात्मक उर्जा मिळते, ती उर्जा आपण एकत्रित येवून जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी वापरावी, असे आवाहन या विविध संघटनेच्या पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्याशी बोलताना केले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष जब्बर पठाण, सरचिटणीस ग्रामसेवक संघटना प्रविण नलावडे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर जाधव, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पांडूरंग जगताप, पोलीस पाटील कडू जगताप, काकासाहेब काळे, तलाठी डी.जी. जराटे आणि जनार्दन उबाळे उपस्थित होते.