कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. गुरुवारी माणुसकीला काळीमा फासणारी आणि प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आणणारी घटना समोर आली आहे. कराडा तील एका कोरोना बाधित महिला रुग्णाला तिच्या घरापासून पायी चालवत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कराडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी शहरासह तालुक्यात 16 नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांमध्ये कराड शहरातील एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल गुरुवारी दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. त्यानंतर घरामध्ये असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. शहरातील महिला रुग्णाला ही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संबंधित महिलेच्या घरी गेले. संबंधित महिलेला घरातून बाहेर बोलावून पायी चालवत तिच्या घरापासून रुग्णालयापर्यंत नेण्यात आले.
हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करीत जाब विचारला. त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचे हास्यास्पद कारण प्रशासनाकडून देण्यात आले. कोरना बाधित रुग्णाला पायी चालवत रुग्णालयापर्यंत नेल्याची देशातील तसेच राज्यातील ही बहुदा पहिलीच घटना असावी. या घटनेने माणुसकीला काळीमा फासण्या बरोबरच प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे सदर व्हिडिओमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या घराशेजारीच एक एम्ब्युलन्स उभी असलेली दिसत आहे. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी यावेळी कोणीही समोर आले नसल्याचे समजत आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/239608223778118/
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”