कोरोनाचे नियम पाळायला सांगणाऱ्यांकडून कोरोना नियम पायदळी; मनपा पथकाचे मात्र वराती मागुन घोडे

Municipal Squad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोनाची तीसरी लाट येणार आहे, ती खुप धोकादायक आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा असे आरोग्य अधिकारी वारंवार सांगत आहेत. मात्र या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवत सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा शल्य चिकित्सकांना काल एका हॉटेलमध्ये निरोप देण्यात आला. यावेळी कोरोना नियम अक्षरशः पायदळी तुडवण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चा तर पुरता फज्जा उडाला असल्याचे पहायला मिळाले. याविषयी एका सजग नागरिकाने मनपाकडे तक्रार केल्यावर मनपाचे पथक आले खरे मात्र तोपर्यंत गर्दी पांगली होती.

औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी हे काल जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून सेवा निवृत्त झाले. यानिमित्ताने विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अनेक जबाबदार अधिकारी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे शनिवार व रविवारी औरंगाबाद शहरात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे, असे असूनही या कार्यक्रमाचे आयोजन करुन एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. एकीकडे प्रशासनाने विवाह समारंभाला उपस्थितीतांची मर्यादा घालून दिली आहे. तोच दुसरीकडे या कार्यक्रमाला मात्र एखाद्या विवाह सोहळ्यापेक्षा जास्त गर्दी जमली होती. यावेळी पुष्पगुच्छ देऊन आपला फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे अक्षरशः धिंडवडे उडाले होते.

• साहेब, नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच का ?
सामान्य नागरिकांनी जर कोरोनाचे नियम तोडले तर प्रशासन नागरिकांवर दंडात्मक कारवाई करते, काही प्रसंगी तर गुन्हे देखील दाखल करण्यात येतात. परंतु हीच कारवाई आता या अधिकाऱ्यांवर देखील होणार का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी, अधिकारी हे वारंवार कोरोना नियम पायदळी तुडवतात परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे साहेब नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहेत का ? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.