सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
कोरोनाच्या काळात हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सेवा सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक स्वरूपाची कारवाईही केली जात आहे. गुरुवारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मालकांसह ११ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील राहणारे हॉटेल अजिंक्यचे मालक अमोल दिलीप कदम व रॉयल रेस्टो हॉटेलचे मालक समीर सलीम मुलाणी यांच्यावर बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हवालदार विजय साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. तसेच त्यांच्याप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सातारा तालुक्यातील कुशी येथे राजयोग लॉजिंग हे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी अविनाश प्रकाश काळे, सचिन रामचंद्र माळवदे व कोरेगाव तालुक्यातील अजिंक्यनगर येथील योगेश बर्गे यांच्यावरही तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचप्रमाणे बोगदा ते यवतेश्वर मार्गावर विनाकारण वाहनातून फिरणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस सूर्यकांत कदम, संभाजी रवींद्र पवार, शिवांकुर विजय बगाडे, योगेश राजेंद्र जाधव, जोतिबा मोरू पाटील, संदीप तुकाराम पवार अशी त्यांची नावे आहेत. बॉम्बे रेस्टॉरंटचौक येथे विनाकारण फिरणाऱ्या आनंद विठ्ठल पोळ (वय ३९, रा. मल्हारपेठ) व जयवंत शिवदास कांबळे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.