कोरोना योद्धे | घाबरुन, सुट्टी काढून गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो..? आता कोरोनाला हरवूनच गावाकडं यायचं..!!

लढा कोरोनाशी | विकी पिसाळ

पोलीस भरती होताना शपथ घेतलीय, मग आता कोरोनाला घाबरून, सुट्टी काढून गावाला कसं जायचं? घाबरुन गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो..?? आता लढायचं, कोरोनाला हरवायचं..!

किरण पिसाळ

पीएसआय किरण पिसाळ (घाटकोपर, मुंबई) यांचा काही दिवसांपूर्वीचा हा फोनवरील संवाद. फोनवरील त्यांचा हा संवाद ऐकुन मी क्षणभर स्तब्ध झालो होतो. त्यांची काळजी वाटते म्हणुन खरंतर दोन दिवसाआड माझे फोन त्यांना चालु आहेत. कसा आहेस.. काळजी घेतोयस ना..शासनाने दिलेल्या गोळ्या रेग्युलर घेतोयस ना..वगैरे प्रश्न माझे रोजचे. खरंतर काळजी घेतोयस ना हे वाक्य आता गुळमुळीत झालय. पण त्याच वाक्याचा आधार आहे मनाला.

कोरोना दिवसेंदिवस बळकट होत चालला आहे. आणि भावाला काळजी घे म्हणतानाही मन भरुन येतच. सुरुवातीला मुंबईत कांदिवली येथे बहिणीकडे थांबुन तुटपुंज्या पगारावर रिलायन्स या कंपनीत असताना तिथले काम पाहत, अभ्यास करत नंतर कित्येक भरत्या ट्राय करुन, कित्येकदा नाऊमेद होऊन चौदा वर्षापुर्वी मुंबई पोलिसमधे अफाट कष्ट करुन भरती झालेला किरण अखेर कॉन्स्टेबल झाला. पण फक्त कॉन्स्टेबल या पोस्टवरच तो समाधानी नव्हता. ते त्याने सुरुवातीलाच उघड बोलुन दाखवलं होतं. कॉन्स्टेबल या पदावर मुंबईत तो भरती होऊन त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास चालुच ठेवलेला. वडील रेल्वेत कामाला. एकुण पाच बहीण भावंडं. लहानपणीची शाळा नायलॉनची, अगर कापडी पिशवीचे दप्तर बनवुन केली. पुढे सुरुवातीला चालत आणि नंतर सायकलवरुन रोजचं आठ किलोमीटर येवुन जाऊन कॉलेज कंप्लिट करणारा किरण. नावाप्रमाणेच त्याच्यासह कुटुंबात ही आशेचा किरण बनुन राहिलाय. हवं तर तो वडिलांच्या नंतर रेल्वेत जाऊ शकला असता..पण त्याने तो मार्ग सोडुन स्वत:च्या हिमतीचा मार्ग पत्करुन सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातुन सुरु झालेला त्यांचा कष्टप्रद प्रवास, भायखळ्यानंतर आज घाटकोपर येथे पीएसआय या पदापर्यंत येऊन पोहोचलाय.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याशी संपर्कात असताना त्यांनी कोरोनाची गंभीरता फोनवरुन सांगितली होती. मी म्हटलंही..मग आता सुट्ट्यांच काय रे तुझ्या? तो म्हणला.

लोक टेन्शनमध्ये आहेत. रोज पाहतोय. कोरोना लवकर आवरेल याची शक्यता कमीच, पोलिसांवरही भरपुर ताण वाढतोय, कित्येक पोलिस कोरोनाग्रस्त होतायत, अन मी या अशा काळात गावाला येऊन करु काय..याचा अर्थ सरळ होतो की मी कोरोनाला घाबरतोय. मग भरती का झालो इतका अभ्यास करुन..ते यासाठी? बरं आणि आलोच गावी. तर ती सल आयुष्यभर राहील. जी मला कधीच दुरुस्त करता येणार नाही. जे होईल ते होईल. माझ्यावर माझा पुर्ण विश्वासय. म्हणुन मी इथुन मुंबईतुन कुठेही हलणार नाही. मोठी जबाबदारी आहे माझ्याकडे. आता कोरोना संपेस्तोवर साप्ताहिक सुट्टीही घेणार नाही. अन गावी येण्याचा तर प्रश्नच नाही.

किरण पिसाळ

त्याचे हे उत्तर ऐकुन मी काळजीत पडलो. पण त्याचे उत्तर त्याच्या स्वभावाला साजेसे होते आणि त्याच्याबद्दल असलेला आजवरचा आदर त्याच्या या उत्तराने अजुन द्विगुणित झाला. सामान्य जनता कोरोनामुळे टेन्शनमध्ये आहे. कित्येक व्यावसायिक, नोकरदार, मंदिर मस्जिद,चर्च.., दळणवळण, व्यवहार..सगळच जागच्या जागी थांबलय. पण पोलिस मात्र आज या प्रसंगाला बेधडकपणे तोंड देत आहेत. कोरोना नव्हता, तेव्हाही त्यांना प्रचंड कामे होती. अन कोरोनामध्येही त्यांना प्रचंड ताण बाळगावा लागतोय. पण या अशा प्रसंगात ही खचुन न जाता, मानसिक स्वास्थ्य ढळु न देता उलट, मी भरती का झालो ते यासाठीच का? हा प्रतिप्रश्न विचारुन निरुत्तर करणारे पीएसआय किरण पिसाळ यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी समोरच्याच्या मनात एक नवा आशेचा किरण निर्माण करतायत हीच आपल्या सर्वांसाठी एक सकारात्मक गोष्ट आहे.

इतकी शांत मुंबई आजतागायत पाहिली नव्हती रे. पण जेव्हा गाडीतुन फिरतो तेव्हा ही शांत झालेली मुंबई पाहतो, रस्ते पाहतो, गल्लीबोळ पाहतो, समुद्र पाहतो तेव्हा वाटतं.. लवकरच हे सगळं पूर्ववत होईल आणि ही मुंबई पहिल्यासारखी गर्दीत हरवुन जाईल. किरण पिसाळ यांचा गावाइतकाच मुंबईवर फार जीव. ज्या मुंबईने आपल्याला सांभाळलं. आज तिच्यासाठी मागे हटायचं नाही. चल.. ठेवतो फोन.. राऊंड ला जायचय आता. एवढं बोलुन त्यांनी फोन ठेवला नी मी क्षणभर स्क्रिनवर त्याच्या नंबरकडे पाहत उभा होतो.

मित्रांनो आज अनेक पोलिस बांधवांची कुटुंबे गावाला आहेत. तर काहींची त्यांच्यासोबत आहेत. जेव्हा कोरोनाचा पेशंट यांच्या डोळ्यासमोर असतो तेव्हा पोलिस प्रशासनाची अवस्था काय होत असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. अनेक पोलिसांचे, पोलिस अधिकार्यांची कुटुंब ही गावाला असल्याने कित्येक पोलिसांना रात्री घरी आल्यावर जेवण नसते. किरण पिसाळही याला अपवाद नाहीत. येताना एखादे केळ..त्याला ही सॅनिटायजरचा हात लावुन, स्वच्छ करुन खाणे, एखादे सफरचंद रात्री.. कधी दुधाचे एक पॅकेट..इतक्यावरच किरण पिसाळ यांच्यासह कित्येक पोलिसांची रात्र या कोरोनामधे व्यतित करावी लागतेय. तर कधीकधी रात्री काहीच न खाताही झोपुन सकाळी पुन्हा ड्युटीवर पोहचावे लागत आहे. गावाकडे असलेल्या यांच्या कुटुंबियांनाही घशाखाली घास उतरत नाही. हे दिसतं तितकं सोप नाहीये मित्रांनो. त्यातुन कर्तव्याची जाण ठेवत, तुमची आमची काळजी घेत पोलिस प्रशासन आज कोरोना सारख्या महाभयंकर पसरलेल्या आजारात ही काम करतय. म्हणुनच आज पीएसआय किरण पिसाळ यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व नेहमी सकारात्मक असणाऱ्या अधिकाऱ्यांना एक कडक सॅल्युट करावासा वाटतोय..

किरण पिसाळ यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांचे आणि पोलीस दलाचे आपण मनोबल वाढवुयात. त्यांच्या सकारात्मक भावनेला प्रोत्साहन देऊयात. खाकी वर्दीतल्या मातीशी इमान राखणाऱ्या स्वाभिमानी पोलिसांना आपण सर्वजण सलाम करुयात. जय हिंद. जय महाराष्ट्र.

लेखावरील प्रतिक्रियांसाठी संपर्क – (विकी पिसाळ) – 8275457453
तसेच किरण पिसाळ यांनाही संपर्क साधू शकता त्यांचा संपर्क क्रमांक – 797295 0231

You might also like