औरंगाबाद : राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण आढळत आहेत. आपल्या शेजारच्या जळगाव जिल्ह्यात या व्हेरीएंटचे रुग्ण आढळल्याने आपल्याला सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. जळगावला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील एन्ट्री पॉईंट (चेक नाके) वर आरटीपीसीआर चाचण्या कडक करण्यात येणार असून चाचणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार असून याबैठकीनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा लेवल-3 मध्ये आहे. लेवल 3 मधील मार्गदर्शक त्तवानुसार दुकाने तसेच सर्व खाजगी आस्थापणांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जाणार आहेत. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी देखील लावली जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी पुर्णत: लॉकडाऊन लावला जाईल असे सांगूण जिल्हाधिकारी म्हणाले की लसीकरण करण्यावर देखील भर दिला जाणार आहे.
तसेच कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत सहकार्य केले असून यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.