हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्व सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशातच आता साताऱ्यात पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढवणारी घटना घडली आहे. याठिकाणी एक कोरोनाबाधित कैदी रुग्णालयातून फरार झाला आहे. आता या कैद्याला शोधण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरु आहे.
या प्रकारामुळे सातारा पोलिसांचाही चांगलीच नाचक्की झाली आहे. मुबारक आदिवाशी असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मुबारकरला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.
मुबारकला कोरोना बाधित असलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी मुबारक पोलिसांचा डोळा चुकवून रुग्णालयाच्या बाहेर पडला. कोविड रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असूनही कैद्याने पलायन केल्यामुळे पोलिसांवर टीका केली जात आहे.