चीनवर कुरघोडी करण्यासाठी भारताला हीच ‘ती’ संधी -नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना संकटामुळे जगाच्या नजरेत चीन खलनायक झाला असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रसार केल्याने चीनविरोधात जगभरात द्वेष वाढत असताना भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची आर्थिक संधी असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कोरोना संकटामुळे जगाच्या नजरेत चीन खलनायक झाला आहे. भारताला याच संधीचा लाभ घ्यायला हवा. या आर्थिक संकटाला संधीमध्ये बदलून परदेशी गुंतवणुकीचा जास्तीत जास्त आकर्षित करण्यावर लक्ष द्यायला हवे, असं गडकरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. हा मुद्दा पटवून देताना यासाठी त्यांनी गडकरींनी जपानचे उदाहरण दिले. ”जपानने चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केला आहे मला वाटतं आपण यावर विचार करणं तसंच लक्ष देणं गरजेचं आहे. आपण भारतात तशी संधी किंवा परिस्थिती निर्माण करुन दिली पाहिजे. आपण त्यांना मंजुरी तसंच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जे काही गरज लागेल ते सर्व देऊ,” असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

गडकरी यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी परवानग्या आणि दुसऱ्या अन्य सुविधांमध्ये वेग आणला जाणार आहे. अर्थ मंत्रालयसह सर्व विभाग आणि आरबीआय कोरोनानंतर अर्थव्यवस्थेमध्ये वेग आणण्यासाठी नीती बनवत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाची अर्थव्यवस्था ५ खरब डॉलरची बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या काळात आपण १०० लाख कोटींच्या पायाभूत सुविधाही निर्माण करू शकणार आहोत.

चीनने कोरोनाची माहिती मुद्दामहून लपविली का, यावर भारत कारवाई करेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. यावर गडकरींनी सांगितले की, हा मुद्दा परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्याशी संबंधीत संवेदनशील विषय आहे. यावर काही सांगणे उचित ठरणार नाही”. “सर्व सरकारी कार्यालयं, खासकरुन अर्थमंत्रालय तसंच आरबीआय करोनाविरोधातील आर्थिक लढाईशी लढत असून वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहेत. तसंच पंतप्रधानांचं पाच ट्रिलियन डॉलरचं स्वप्न पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत,” असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment