राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनच्या निकषात बदल- आरोग्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानूसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान आता राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही असा जिल्हा ऑरेंज झोन तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असं राजेश टोपे म्हणाले. तर ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असेल, असंही टोपे यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार 15 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे. तर ऑरेंज झोनमधल्या जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. वाहतुकीत सवलत देण्यात येईल. तर ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळेल. ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्यानं हटवले जातील आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी ६३५९ पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment