हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे.
यासोबतच हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. यापैकी 1203 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 राज्यात 800 लोकांचा शोध सुरु आता सुरु आहे. यांच्या संपर्कातल्या आलेल्यांचे आकडे हजारात असू शकतात. जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल झाले होते, अशी देखील माहिती आहे.
विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाने मरकजमध्ये सामील लोकांची लिस्ट 21 मार्चलाच सर्व राज्यांना कळवली होती. 19 मार्चला जेव्हा तेलंगणामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेले 19 जण पॉझिटिव्ह आढळले होते त्याचवेळी केंद्राने राज्यांना कळवले होते. आज त्याला 10 दिवस पूर्ण होत आहेत. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’