प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी; इक्बाल चहल सूत्र घेणार हाती

मुंबई । मुंबईत कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच राज्य सरकारने मुंबई पालिकेचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यात पहिला दणका मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना देण्यात आला आहे. परदेशी यांच्या जागी मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्र इक्बाल चहल हाती घेणार आहेत.

प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे तर नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव असलेले इक्बाल चहल हे आता मुंबई पालिका प्रशासनाचे प्रमुख असणार आहेत. मुंबईत कोरोनाचे संकट गडद होत असताना स्थिती हाताळण्यात प्रशासन कमी पडत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत मुंबईत जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने उघडण्याबाबतचा आदेश काढताना पालिका आयुक्तस्तरावर गोंधळ पाहायला मिळाला. त्याचाही फटका परदेशी यांना बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई पालिका प्रशासनात आणखीही मोठे बदल करताना ठाणे पालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांची मुंबई पालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे पालिकेचे आतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची मदत आणि पुनर्वसन सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

You might also like