टेंशन वाढलं! देशभरात कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत १९५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोनाचा संसर्ग थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून आता मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाने १९५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या २४ तासांत मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. देशात एकूण १५६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ही ४६ हजार ४३३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ९०० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आढून २७.४१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने ही एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासांत १०२० जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. यानुसार आतापर्यंत एकूण १२ हजार ७२७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा देशात १२ दिवस इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान, काही राज्यांकडून कोरोना रुग्ण आणि त्यांच्या मृतांची आकडेवारी वेळेवर मिळत नाही आहे. आम्ही यासाठी सतत पाठपुरावा करत असून त्यांचे रिपोर्ट हाती आल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या असून मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. कोरोना रुग्ण आणि करोना नसलेल्या रुग्णांनाही सरकारी आणि खासगी हॉस्पटिल्समध्ये योग्य वेळी उपचार होतील याची दक्षता घेण्यात येत आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यासाठी आरोग्य सेवा सुरळीत राहील, असा आरोग्य विभागाचा प्रयत्न असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

You might also like