लॉकडाउन कायम ठेवा! परंतु..; उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाउन कायम ठेवत काही निर्बंध शिथील करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनी राज्यात पोलिसांना विश्रांती देण्याची गरज असून केंद्रीय पोलीस दलाला राज्यात पाठवावं अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या १७ मेला संपत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती देत आपलं म्हणणं पंतप्रधान मोदींपुढे मांडलं.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “शेतकऱ्यांसाठी आम्हाला कर्जाची गरज आहे. स्थलांतरित कामगार राज्य सोडून जात आहे. यावेळी कोरोनाचे विषाणू ते आपल्या घरी नेणार नाहीत याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाण्याची जबरदस्ती करु नये. शक्य असेल तर त्यांनी येथेच थांबावं. लॉकडाउन उठवला जाऊ नये. तो कायम ठेवून काही निर्बंध शिथील केले जावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्यं त्याप्रमाणे अंमलबजावणी करूत असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. गेल्या २ महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले महाराष्ट्रीय परत येत आहेत. हे मजूर विविध झोन्समधून ये जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, अन्यथा संसर्ग वाढण्याचा धोका देशाला आहे. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

आपण एप्रिल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असं सांगण्यात येते की मे महिन्यात या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो असेही बोललं जात आहे. वुहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय असे मी वाचले. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment