Tuesday, January 31, 2023

धोक्याची घंटा! कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत १० व्या स्थानी

- Advertisement -

नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या साथीला रोखण्यात अजूनही यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, काल रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या स्थानी पोहोचला आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या ४ हजारावर पोहोचली आहे. यामुळे अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता १० व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे. भारतात सध्या ७५ हजार ७०० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्सनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात सध्या करोनाचे एकूण २८ लाख सक्रिय रुग्ण असून एकट्या अमेरिकेत ही संख्या ११ लाख आहे.

गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्र अजूनही पहिल्या क्रमांकावर असून ३०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत १७२५ नवे रुग्ण मिळाले आहेत. याचसोबत राज्याने कोरोना रुग्णांचा ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे. तामिळनाडूत ७६५ नवे रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या १६ हजार २७७ झाली आहे. आठ रुग्णांच्या मृत्यूसोबत मृतांची संख्या ११२ झाली आहे.

- Advertisement -

तर पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत २०८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६७७ झाली असून २७२ मृतांची नोंद झाली आहे. करोनाचा फटका बसलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये गुजरातचाही क्रमांक असून ३९४ नवे रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १४,०६३ वर पोहोचली असून मृतांच्या संख्या ८५८ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”