पुणे । राज्यातील कोरोना संसर्गाचं केंद्रबिंदू बनलेल्या पुणे शहरात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, अशी शाश्वतीराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्याच्या घडीला पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत असल्याचे टोपे यांनी सांगितले.
याशिवाय, खासगी रुग्णालयांकडून लोकांना लुबाडले जाणार नाही, याचीही काळजी घेत असल्याचे टोपे यांनी म्हटले. कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राने देशात दिशादर्शक काम केले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडस् मिळावेत, यासाठी दोन अधिकारी नेमले आहेत. रुग्णांकडून जास्त पैसे आकारले जाणार नाही, यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने या सगळ्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, यावर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात आता अनलॉकची प्रकिया सुरु आहे. पुण्यात दरवर्षी गणपती उत्सव सर्व आनंदउत्सवाने साजरा केला जातो. पण यावेळी कोरोनामुळे गणेशोत्सव पुण्यात साध्या पद्धतीने शासन नियमाप्रमाणे साजरा केला जावा, असे आवाहन यावेळी राजेश टोपे यांनी केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”