सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असताना परदेशातून आलेल्यांची संख्या ही वाढली आहे. प्रशासनाने केलेल्या सर्व्हेनुसार आत्तापर्यंत ११७ नागरिक हे परदेशातून सांगलीत आले आहेत. यामध्ये दोघे जण कोरोना संशयित असल्याने प्रशासनाने त्यांना आयसोलेशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून रिपोर्ट पुण्यातील लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तो रिपोर्ट उद्या येणार आहे. त्यानंतर या संशयितांना कोरोना आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. Coronavirus Update
मात्र कोरोना वर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेल्या ११८ प्रवाशांना घरातच निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र कालावधी संपण्याआधीच काहीजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे झाल्यास त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षामध्ये ठेवू, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. Coronavirus Update
दरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून धार्मिक पूजेवर बंदी नाही पण गर्दी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. करोना बाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती. Coronavirus Update