विप्रो पुण्यात उभारणार विशेष कोविड रुग्णालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने 450 खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र सरकारसमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे.आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे प्रदान करणार आहे. कोरोनाविरुद्ध लढतांना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल.

450 खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात 12 खाटा उपलब्ध असतील. हे कोविड 19 साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात 24 उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.

विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड 19 विरुद्ध लढताना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत 1125 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. कोरोनाचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल. विप्रोने मुंबई, पुणे, औरंगाबाद वाळूज, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत देशातील 34 लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”