Saturday, February 4, 2023

कोरोनाच्या उद्रेकामुळे औरंगाबाद शहरातील पर्यटन व्यवसायाला घरघर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरातील पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि टूर्स ट्रॅव्हल्स एजन्सीचे काम ठप्प असून, जवळपास एक लाखांपेक्षा जास्त जणांच्या हाताचा रोजगार तूर्तास हिरावला गेला आहे.

शासनाने औरंगाबादला पर्यटनाच्या राजधानीचा दर्जा दिला. शहरातील बीबी – का – मकबरा, पानचक्की, वेरूळ-अजिंठा लेणी, देवगिरी किल्ला ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी देश – विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी औरंगाबाद शहरात वीस ते पंचेवीस मोठे हॉटेस आणि सुमारे 175 मध्यम स्वरुपाचे व लहान स्वरुपाचे हॉटेल आहेत. टूर्स ट्रॅव्हल एजन्सीजची संख्या देखील मोठी आहे.

- Advertisement -

हॉटेल आणि टूर ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाशी भाजी विक्रेता, टॅक्सी चालक, गाइड अशा छोट्या – छोट्या घटकांपासून हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळणारी यंत्रणा, हॉटेलमधील कर्मचारी आदी जोडलेले आहेत. यांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. गेल्या आठ – दहा दिवसांपासून ‘कोरोना’ने डोके वर काढले आहे. त्यामुळे पर्यटननगरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या एकदम कमी झाली आहे. गेल्या तीन – चार दिवसांपासून तर देशी – विदेशी पर्यटक येणे जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सर्वच घटकांवर संक्रांत ओढावली आहे.