कोल्हापूर प्रतिनिधी | मटका आणि क्रिकेट बेटींग प्रकरणी इचलकरंजी येथील नगरसेवक संजय तेलनाडे व त्याचा कर्नाटकातील साथीदार जावेद दानवाडे याच्यासह सहाजणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. नगरसेवक तेलनाडेसह दानवाडेला लवकरच अटक करण्यात येईल, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.
फिरोज रजाक शेख, सचिन धोंडीराम गिरी, प्रकाश जयराम सुतार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही संशयित कळंबा येथील उमरफारूक रजाक शेख यांच्या बंगल्यातील दुसर्या मजल्यावर मुंबई, कल्याण मटक्याचा अड्डा चालवत होते. शिवाय क्रिकेट बेटिंगचा जुगार घेत असल्याची माहितीही चौकशीत निष्पन्न झाली आहे
क्रिकेट सट्टा, मटका बुकीप्रकरणी शेख, गिरी, सुतार याच्यावर तर नगरसेवक संजय तेलनाडे, जावेद दानवाडेवर मटकाबुकी प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. या कारवाईत 68 हजार 200 रुपयांची रोकड, 71 हजार रुपये किमतीचे 11 मोबाईल हँडसेट, एलईडी टीव्ही, कलर प्रिंटर, दुचाकी वाहने, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, जेरबंद संशयित फिरोज शेख याच्याकडे चौकशीत मटका जुगाराचा तेलनाडे हाच मुख्य मालक आहे.
क्रिकेट बेटिंगप्रकरणी विजापूर येथील नूर सय्यदच्या सांगण्यावरून क्रिकेट सट्टा घेण्यात येत आहे, अशीही त्याने कबुली दिल्याचे सांगण्यात आले. तेलनाडे, जावेद दानवडे, नूर सय्यदवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस अधिकारी तानाजी सावंत यांनी सांगितले.