औरंगाबाद – देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाचा मनपाच्या शिक्षण विभागाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाने काल शिक्षक दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन केले नसून, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे सौजन्यही मनपाने दाखविलेले नाही. यामुळे महानगरपालिकेला शिक्षक दिनाचा विसर पडला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी शिक्षक दिनानिमित्त मनपाच्या शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनी भरगच्च कार्यक्रम कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. पाच आदर्श शिक्षक ही निवडण्यात येत होते. आजघडीला मनपाच्या आस्थापनेवर सुमारे 412 शिक्षक आहेत. तासिका तत्त्वावरील शिक्षकांची संख्या वेगळीच आहे. मनपा मुख्यालयात दरवर्षी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते.
यंदा मात्र शिक्षक दिनी रविवार असल्यामुळे मनपाला अभिवादनाचा ही विसर पडला. मनपाच्या शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणावर अनेक शिक्षकांनी टीकाही केली आहे.