औरंगाबाद | महानगरपालिकेकडून शहरातील गरीब इंग्रजीतून मुलांना शिक्षण मिळावे यासाठी सीबीएससी वर्ग सुरू करण्यात आले होते. यामध्ये गुरुगोविंदसिंगपुरा गारखेडा या दोन्ही शाळेतील सीबीएससीच्या ऑनलाईन शिकवणीला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शाळेत प्रवेशासाठी पालकांच्या उड्या पडल्याने पालिकेला प्रतीक्षा यादी तयार करण्याची वेळ आली आहे.
15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. पालिकेने गुरुगोविंदसिंगपुरा आणि गारखेडा या शाळात ज्युनिअर केजी, सिनियर केजी, फर्स्ट आणि सेकंडचे वर्ग सुरू केले आहेत.
या वर्गात प्रत्येकी 25 मुलांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. परंतु अजूनही प्रवेशासाठी पालकांच्या चकरा सुरू असल्याने पालिकेला नाईलाजाने प्रतीक्षायादी तयारी करावी लागत आहे. दरम्यान सोमवारपासून ऑनलाइन शिकवणीला सुरुवात झाली. या शिकवणीला सर्वच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.