बेकायदा बॅनर्सवर मनपाचा हातोडा

औरंगाबाद | महानगरपालिकेच्या दोन झोन कार्यालयाच्या वतीने शनिवारी शहरातील बेकायदा बॅनर्स, पोस्टर्स हटावची मोहीम राबविण्यात आली होती. काल दिवसभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांचे १८५ होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स आणि २०० झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून आगामी मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने राजकीय कार्यक्रम होत आहेत. त्यानिमित्त शहरात बेकायदा बॅनर्स, होर्डिंग्ज यांचा सुळसुळाट झाला आहे.

मनपाची कोणतीही परवानगी न घेता वाटेल त्या ठिकाणी होर्डिंग्ज, पोस्टर्स झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. म्हणून मनपाने काही दिवसांपासून हे होर्डिंग्ज काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मनपाच्या झोन दोन कार्यालयांचे वार्ड अधिकारी आठवले यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने समर्थनगर, समतानगर, शहागंज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, बसस्थानक रोड, औरंगपुरा ते मिल कॉर्नर रोडवरील सुमारे ३५ मोठे बॅनर, १५० होर्डिंग्ज आणि दोनशे झेंडे काढले.

दहा ते बारा कार्यकर्त्यांनी आपल्या बॅनर स्वतःहून काढून घेतले होते. झोन कार्यालयाच्या पथकाने हाताला येतील असे होर्डिंग बॅनर पोस्टर काढले हात न पुरवणारे आणि मोठे होर्डिंग बॅनर पोस्टर काढण्याबाबत अतिक्रमण हटाव पथकाला कळविण्यात आले होते. या पथकाकडे साहित्य असून या पथकाने ही बेकायदा पोस्टर बॅनर काढण्यासाठी मदत केली, या पथकाने काढलेल्या बॅनर चा आकडा मात्र कळू शकला नाही.

You might also like