Friday, January 27, 2023

कर्वे समाज संस्थेतर्फे मजुरांसाठी समुपदेशन

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी |पुण्यातील कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीज आणि पुणे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील क्रेडाच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचा लाभ सुमारे तीन हजार मजुरांना होणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अनुसरून राज्यातील विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या सर्व बांधकाम कामगार व मजुरांना कोविड १९ बाबत शास्त्रशुद्ध माहिती पुरविणे, कामगार व मजुरांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांना मानसिक समुपदेशन करणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य संचालनालयाने राज्यातील जिल्हा रुग्णालये, मेडिकल कॉलेज व समाजकार्य महाविद्यालयाच्या मदतीने मजुरांना मानसिक समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचाच एक भाग म्हणून कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजच्या वतीने समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाचे ३५ विद्यार्थी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील क्रेडाच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या मनोविकार तज्ञ डॉ मधुमिता बहाले व मानसोपचार तज्ञ मिलिंद कारंजकर यांच्या मदतीने प्रत्यक्षपणे जाऊन मजुरांना कोविड १९ बाबत शास्त्रशुद्ध माहिती पुरवित त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांना मानसिक समुपदेशन करीत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजचे चेअरपर्सन प्रा. चेतन दिवाण यांनी दिली.

- Advertisement -

कोविड १९ या महामारीपासून सर्वप्रथम स्वतःचे संरक्षण करणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित सामाजिक –शारीरिक अंतर ठेवणे, तोंडावर मास्क बांधणे, सतत साबणाने हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम करणे तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी कोरोनाबाबत विनाकारण मनामध्ये येणारे निरनिराळे विचार टाळणे, चिंता, भीती, उदासी आदी समस्यांपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे या व अशा अनेक विषयांवर यावेळी मजुरांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे प्रा. चेतन दिवाण यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”