नागपूर । कोरोनाविरोधी लढ्यासाठी आर्थिक मदत म्हणून राज्यातील नागरिकांकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत तब्बल ५४१ कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या संदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. मुख्यमंत्री कार्यालतील जनसंपर्क अधिकारी मिलिंद कापडी यांनी कोलारकर यांच्या अर्जाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री निधीला मिळालेल्या निधीचा सविस्तर तपशील दिला आहे.
त्यानुसार, कोरोना काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ५४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या ३ तारखेपर्यंत त्यातील १३२.३ कोटी रुपयेचं खर्च झाले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीतून समोर आलं आहे. कोविडशी संबंधित उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला १.२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
तर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलला २० कोटी रुपये, रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय व जालना जिल्हा रुग्णालयाला प्रत्येकी १.०७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जालना येथे रेल्वेखाली चिरडून मृत्यू पावलेल्या १६ मृतांच्या कुटुंबीयांना ८ कोटींची मदत देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री साहाय्यात निधीला मदत देणाऱ्यांची नावे द्यावीत, अशी मागणीही कोलारकर यांनी केली होती. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं कारण देत देणगीदारांची नावे देण्यास नकार देण्यात आला आहे. शिवाय, सरकारकडून मिळालेल्या माहितीमध्ये देणगीदारांची नावे नाहीत. केवळ धनादेशाचे क्रमांक आहेत. त्यावरून नावे शोधून काढणे खूपच जिकिरीचे काम आहे,’ असं मिलिंद कापडी यांनी स्पष्ट केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”