Wednesday, March 29, 2023

महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम; मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा सुरु

- Advertisement -

मुंबई । महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात सध्या लॉकडाऊनचे जे नियम लागू आहेत तेच नियम राहणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची होणार वाढ आणि संसर्ग यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करणार नसल्याचं म्हटलं होतं. राज्यात हळूहळू शिथिलता आणली जाईल असं त्यांनी जनतेला संबोधित करत असताना म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा राज्यात सुरु झाला आहे. यामुळे राज्यात ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना निर्बंध शिथिलीकरणाबाबत ठोस भाष्य करणे टाळलं होतं. यामुळे निर्बंधांबाबत अनिश्चितता कायम होती. गर्दीच्या आणि रुग्णसंख्या वाढीची भीती असलेल्या लाल क्षेत्रातील (रेड झोन) निर्बंध अधिक कडक करण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. लॉकडाउनचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

- Advertisement -

“३० जूनला लॉकडाउन संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका. आजही ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. ’राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्यावर तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजार रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सरकारसाठी हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला होता. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच लांबचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येणार आहे. मात्र मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं सक्तिचं असणार आहे.

दुसरीकडे २ जुलैपासून पुढील १० दिवस ठाणे शहरात संपूर्ण लोकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे शहर पोलिसांनी ट्विट करुन दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा ठिकाणी देखील लॉकडाऊन करण्यात येईल याकडे देखील लक्ष असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”