लग्नाला जाणं उठलं जीवावर! वऱ्हाडी ५५, १७७ जणांना कोरोनाची बाधा; लग्नात न आलेल्या ७ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचा कहर अजूनही सुरु आहे. परिस्थिती काहीशी सावरत असताना अनेक ठिकाणाचा लॉकडाऊन शिथिल केल्यावर जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. नियम पाळण्याचं, फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचं आवाहन जगभरातल्या प्रशासकीय यंत्रणा करत आहेत. मात्र अनेक जण नियम धाब्यावर बसवतात. त्याचा परिणाम मग अनेक निष्पाप नागरिकांना भोगावा लागतो. अमेरिकेतल्या मेन नावाच्या राज्यात असाच एक प्रकार घडला आहे. अमेरिकेतील आरोग्य संघटना ‘सेंटर फॉर डिजीज कंट्रोल’नं (सीडीसी) या घटनेचा संपूर्ण अभ्यास केला. त्यातून समोर आलेली माहिती आणि आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. लग्नात ५५ जण सहभागी झाले असताना एकूण १७७ जणांना कोरोना झाला. तर ७ जणांचा मृत्यू झाला.

अमेरिकेतल्या मेन राज्यात ७ ऑगस्टला एक विवाह सोहळा संपन्न झाला. सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी लग्नाला आलेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यानंतर लग्नाला आलेल्या सर्वच्या सर्व ५५ पाहुण्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या. त्यातून २७ जणांना कोरोना झाल्याचं समजलं. या पाहुण्यांनी लग्नात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळलेले नव्हते. याशिवाय मास्कही घातले नव्हते.

लग्नानंतर स्थानिक भागात कोरोना चाचण्या झाल्या. यामधून २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली. यातल्या एकाचा मृत्यू झाला. लग्नाला उपस्थित राहिलेला एक जण दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना भेटला. त्याचे वडिल आरोग्य कर्मचारी होते. त्यांच्या माध्यमातून रुग्णालयातील ३८ कर्मचारी आणि काही अन्य जण कोरोनाबाधित झाले. या व्यक्ती लग्न स्थळापासून १६० किलोमीटर वास्तव्यात आहेत. यातील एकही व्यक्ती लग्नाला उपस्थित नव्हती. पण त्यांच्यातल्या ६ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला.

लग्नाला उपस्थित राहिलेला आणखी एक पाहुणा ३२० किमीवरून आला होता. या व्यक्तीच्या शरीरात आठवड्याभरानंतर कोरोनाचा विषाणू आढळून आला. तो तुरुंगात काम करत होता. त्याच्यामुळे १८ कर्मचारी आणि ४८ कैद्यांना कोरोना झाला. तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील १६ जणांना कोरोनाची बाधा झाली. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांची यादी यजमानांनी तयारच केली नव्हती किंवा ती यादी आरोग्य यंत्रणेला दिलीच गेली नाही, असं सीडीसीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like