महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; पहा कोणाची वर्णी लागली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत. झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. रात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार या सर्व नियुक्त्या करण्यात आल्यात. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी या सर्व राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.  राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. वयाच्या 16 व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी कार्य सुरु केले. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. एवढच नव्हे तर तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते. आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

राज्यातील नवनियुक्त राज्यपालांची संपूर्ण यादी

सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
रामेन डेका – छत्तीसगड
संतोषकुमार गंगवार – झारखंड
ओमप्रकाश माथूर – सिक्किम
लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा – तेलंगणा
गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड
सी. एच. विजयशंकर – मेघालय