कोरोनातून बरे झाल्यावर लोकांमध्ये जनजागृती निर्माण करा’ ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे कोरोनाबाधित रूग्णांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना लढाईत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. तुम्ही लवकर बरे व्हा, बरे झाल्यावर लोकांमध्ये कोरोना आजार होऊ नये या संदर्भात घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करा, असे आवाहन पैठण येथील कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्याशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी केले.

पैठण येथील समाजकल्याण मुलींच्या वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील सोयी सुविधा, क्षमता आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी आढावा घेतला. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यावर भर देऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याठिकाणी कोरोना रुग्णांशी संवाद साधतांना त्यांना येणाऱ्या समस्यांची विचारपूसही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्वत: केली. यावेळी स्वच्छता सामग्रीची कमतरता असल्याचे रुग्णांनी सांगताच तातडीने याठिकाणी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी दिले. सध्या या केंद्रात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित बी.एससीच्या विद्यार्थ्याने परीक्षेला बसू देण्याची विनंती जिल्हाधिकारी चव्हाण यांना केली. या विद्यार्थ्यास पीपीई किटसह परीक्षेला स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करावी, असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

पैठणमधील महसूल प्रबोधिनीतील कोरोना केअर सेंटर येथील रूग्णांशीही चव्हाण यांनी संवाद साधला. तसेच पैठण येथील घाटी रूग्णालयाच्या युनिटची पाहणी करत याठिकाणी डीसीएचसी सुरू करण्याबाबत विचार करावा, असेही अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, प्रभारी तहसीलदार दत्ता निलावाड, तालुका आरोग्य अधिकारी भूषण आगाज आदी उपस्थित होते. कोरोनाबाधितांची दखल घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांचे रूग्णांनी आभार मानले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp ग्रुप Join करा

Click here to Join our Whatsapp Group

Leave a Comment