धक्कादायक! विराटच्या ‘या’ सहकाऱ्याला पोलिसांकडून मारहाण

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका राष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांनी मारहाण केली आहे. या पोलिसांनी क्रिकेटपटूच्या चेहऱ्यावर मारहाण केली आहे. यामध्ये या क्रिकेटपटूचा डोळा थोडक्यात बचावला आहे. विकास टोकस असे या क्रिकेटपटूचे नाव असून या प्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विकास टोकस हा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीमचा सदस्य होता.

विकास टोकस याने दिल्लीतील भिकाजी कामा पोलीस स्टेशनमधील पोस्ट इंचार्जच्या विरूद्ध हि तक्रार दाखल केली आहे. या अधिकाऱ्यानं आपल्याशी गैरव्यवहार केला. तसेच चेहऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत आपला डोळा थोड्यात बचावला असल्याचे विकासने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. विकासने या प्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यालयात याबाबतचा ईमेल केला आहे. ’26 जानेवारी 2022 रोजी माझ्याबाबत जे घडलं त्याची तक्रार करण्यासाठी हा ईमेल करत आहे. मी नॅशनल आणि आयपीएल क्रिकेटपटू आहे. त्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यानं माझ्याशी केलेला व्यवहार निंदनीय होता. एका अधिकाऱ्यानं मला बुक्की मारली. माझा डोळा निकामी होण्यापासून थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणाची तुम्ही तातडीने दखल घ्यावी असे तुम्हाला निवेदन करतो. कारण, या घटनेचा मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे,’ असे विकासने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. याबरोबर त्याने स्वतःचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

विकास टोकस याची कारकीर्द
विकास टोकस हा दिल्लीमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो या अगोदर रेल्वेकडून खेळला आहे. विकास टोकस याला आयपीएल 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने करारबद्ध केले होते. त्यावेळी विराट कोहली हा आरसीबीचा कॅप्टन होता. पण विकास टोकसला त्यावेळी एकाही आयपीएल मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने 15 फर्स्ट क्लास आणि 17 टी20 मॅच खेळल्या आहेत.