सचिन तेंडुलकरला मागे टाकत राहुल द्रविड ठरला भारताचा महान टेस्ट क्रिकेटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विस्डेन इंडियाने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविड हा गेल्या 50 वर्षातील भारताचा महान कसोटी फलंदाज म्हणून निवडला गेला आहे. विशेष म्हणजे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकून राहुलने ही कामगिरी केली आहे.

विस्डेन इंडियाच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवर झालेल्या या सर्वेक्षणात द्रविडला एकूण 11,400 चाहत्यांपैकी 52 टक्के मते मिळाली. सुरुवातीला द्रविड मागे होता पण त्याच्या खेळण्याच्या दिवसांप्रमाणेच त्याने इथेही शेवटपर्यंत संघर्ष केला आणि शेवटी जिंकला.

या ऑनलाइन सर्वेक्षणात 16 भारतीय खेळाडूंचा समावेश होता, त्यापैकी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि विराट कोहली अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकले. गावस्कर यांनी विराट कोहलीला मागे ठेवून यामध्ये तिसरे स्थान राखण्यात यशस्वी झाले.

राहुल द्रविडने 1996 ते 2012 दरम्यान 164 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या आहेत. त्याच वेळी सचिन तेंडुलकरने 1989 ते 2013 दरम्यान 200 कसोटी सामन्यांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या. सचिनच्या नावे 51 कसोटी शतके आहेत तर द्रविडने 36 कसोटी शतके केली आहेत.

धावा आणि विक्रमांच्या बाबतीत सचिन कदाचित पुढे असेल, पण द्रविडला त्याच्या कठीण परिस्थितीत चमकदार फलंदाजी करण्याच्या शैलीमुळे चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळू शकले. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करीत असताना द्रविडने अनेक वेळा भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

द्रविडने परदेशी भूमीवरील 94 कसोटी सामन्यात 53.03 च्या सरासरीने 7690 धावा केल्या. त्यापैकी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज विरूद्ध खेळलेल्या 64 कसोटी सामन्यांमध्ये त्याने सुमारे 52 च्या सरासरीने 5443 धावा केल्या.

तेंडुलकरने भारताबाहेरही 106 कसोटी सामने खेळले आणि 54.74 च्या सरासरीने 8705 धावा केल्या. यात 29 कसोटी शतकांचादेखील समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये मिळून त्याने 56 कसोटी सामने खेळले. त्याची सरासरी 49.79 इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment