Tuesday, June 6, 2023

वयाच्या १९ व्या वर्षी ‘या’ महिला क्रिकेटपटूने दुहेरी शतक झळकावून रचला इतिहास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधना हिच्या नावावर आज अनेक विक्रम आहेत. २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मंधनाने भारताकडून २ कसोटी, ५१ वनडे आणि ७५ टी -२० सामने खेळलेले आहेत.

मंधनाने ५१ एकदिवसीय सामन्यातून २ हजार २५ धावा केल्या असून त्यामध्ये ४ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ७५ टी -२० सामन्यांत तिने १७१६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तिच्या १२ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८ मध्ये या स्टार फलंदाजाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयसीसीतर्फे सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. तसेच त्याच वर्षी ती सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू म्हणूनही निवडली गेली.

१८ जुलै १९९६ रोजी मुंबईत जन्मलेल्या मंधनाचे वडील आणि भाऊ दोघेही जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते. आपल्या भावाला महाराष्ट्र अंडर १६ च्या स्पर्धेत खेळताना पाहून मंधनाला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यानंतरच क्रिकेटलाच तिने आपले आयुष्य बनवले.

वयाच्या नवव्या वर्षी, मंधनाची महाराष्ट्राच्या अंडर १५ संघात निवड झाली आणि वयाच्या ११ व्या वर्षी, तिला राज्याच्या अंडर १९ संघात निवडले गेले. तिचे वडील क्रिकेटच्या कार्यक्रमाची काळजी घेत असत. आईने तिच्या डाएटची जबाबदारी घेतली आणि भाऊ तिला नेटमध्ये बॉलिंग करायचा.

ऑक्टोबर २०१३ मध्ये, महाराष्ट्राकडून गुजरातविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा त्याने दुहेरी शतक ठोकले तेव्हा मंधनाच्या कारकीर्दीचा आलेख आकाशाला भिडला. असे करणारी मंधना ही पहिली भारतीय महिला ठरली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.