‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली झाला भावुक

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक फॅन्ससह सर्व खेळाडू निराश झाले आहेत. यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील नाराज झाला आहे. या पराभवानंतर विराटने एक भावुक करणारे ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने टीममधील सहकारी आणि फॅन्स यांना धीरदेखील दिला आहे.

याबाबत विराटने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये तो म्हणाला कि, “ही फक्त एक टीम नाही तर कुटुंब आहे. आम्ही सर्व जण एकत्र पुढे जाऊ.” या ट्विटच्या माध्यमातून विराटने सर्व खेळाडू आणि फॅन्सना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फायनलमधील पराभव विसरुन आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे आवाहन विराटला या ट्विटमधून करायचे आहे. टीम इंडियाला आता यजमान इंग्लंड विरुद्ध पाच कसोटींची मालिका खेळायची आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट सीरिजचा भाग असणार आहे. जर टीम इंडियाला पुढील वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये जायचे असेल तर ही मालिका जिंकणे खूप गरजेचे असणार आहे.

तिसऱ्यांदा निराशा
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने या संपूर्ण वर्ल्ड टेस्ट सीरिजमध्ये जोरदार कामगिरी करत सर्वाधिक पॉईंट्ससह फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण फायमलमध्ये त्यांना पुन्हा एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी गमावली आहे. या अगोदर टीम इंडियाने कोहलीच्या नेतृत्त्वाखाली 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कप सेमी फायनल गमावली होती.