‘तो’ निर्णय बदलण्याची होती संधी; पराभवानंतरही विराट कोहलीला पश्चाताप नाही

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – न्यूझीलंडने आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीने न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, परंतु रिषभ पंत व रोहित शर्मा वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले अन् भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. केन विलियम्सन व रॉस टेलर हे अनुक्रमे ५२ व ४७ धावांवर नाबाद राहिले.

या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने काही चुका कबुल केल्या. पण, Playing 11 मध्ये काही चूक होती हे त्याने मान्य केले नाही. टीम इंडिया ज्या 11 खेळाडूंसह फायनलमध्ये उतरली, त्याबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचे विराटने सांगितले. टीम इंडियाने फायनलच्या एक दिवस आधीच अंतिम 11 जणांची घोषणा केली होती. विराट त्यावर म्हणाला की, “फायनलच्या एक दिवस आधी आम्ही टीमची घोषणा केली याचा आम्हाला कोणताही पश्चाताप नाही. आम्हाला टीममध्ये एका ऑल राऊंडरची गरज होती. आम्ही आमची बेस्ट 11 खेळाडू मैदानात उतरवले होते.

विराट कोहली पुढे म्हणाला, ३+२ या कॉम्बिनेशनसोबत आम्ही वेगळ्या वातावरणात विजय मिळवले आहेत. ३+२ कॉम्बिनेशन हे सर्वोत्तम आहे, असा आम्ही विचार केला आणि आमच्याकडे फलंदाजीतही डीपनेस होता. हा सामना आणखी काही वेळ चालला असता तर फिरकीपटूंनी त्याला चांगली कलाटणी दिली असती.

You might also like