कराड | जादा व्याजाने पैशाचा परतावा करण्याचे आमिष दाखवून शिरवडे परिसरातील महिलांना आवर्ती ठेवच्या (रिकरिंग डिपॉझिट) नावाखाली पुण्याच्या एका कंपनीने तब्बल 20 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला आहे. त्या फसवणुकीबद्दल पुण्याच्या सॉईल ग्रुप प्रॉपर्टीज अॅण्ड इस्टेट इंडिया कंपनीसह त्याच्या प्रमुखांवर तळबीड पोलिसात गुन्हा दाखल झाला. कंपनीचे प्रमुख शिवाजीराव किसन जाधव (रा. प्रकाश हाउसिंग सोसायटी, थेरगाव, चिंचवड- पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शकुंतला नामदेव पेठकर (वय – 50, रा. शिरवडे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकुतला पेठकर यांच्याकडे प्रभाकर मोरे यांना पुण्याच्या एका कंपनीत आरडी म्हणजेच आवर्ती ठेव स्वरूपात पैसे गुंतविण्याची योजना मांडली. त्यानुसार पुण्याच्या सॉईल ग्रुप प्रॉपर्टीज अॅण्ड इस्टेट इंडिया कंपनीत पैसे भरण्याचेही त्यांचे ठरले. जितकी जादा रक्कम तितका चांगला फायदा होणार असल्याने शकुंतला पेठकर यांनी गावातील महिलांसह गुंतवणूकदारांना त्याची माहिती दिली. त्यावरून गावातील 214 महिलांचं काही ग्रामस्थांनाही जानेवारी 2013 पासून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम त्या कंपनीच्या सातारा येथील कार्यालयात भरली. ती रक्कम मे 2018 पर्यंत त्यावेळी शकुंतला पेटकर यांच्या गटाचे 61 खातेदारांचे 8 लाख 84 हजार यांनी भरले होते. शकुंतला पेठकर यांनी त्यांच्या प्रमाणे शुभांगी जगदाळे यांनी त्यांच्या खातेदारांचे 2 लाख 93 हजार रुपये, शुभांगी शिंदे यांनी 85 हजार 400 रुपये, शुंभागी तांबे यांनी 1 लाख 28 हजार 400 रुपये, कविता वाघमारे यांनी 26 खातेदारांचे 2 लाख 36 हजार, मंगल यादव यांनी 24 खातेदारांचे 3 लाख 45 हजार रुपये पुण्याच्या सॉईल ग्रुप प्रॉपर्टीज अॅण्ड इस्टेट इंडिया कंपनीच्या सातारा कार्यालयात प्रभाकर मोरे यांच्यातर्फे भरले होते.
सातारा येथील ऑफिस बंद झाल्यानंतर काही रक्कम फलटण व पुणे येथील ऑफिसमध्ये भरलेली आहे. प्रभाकर मोरे यांचे 2020 रोजी निधन झाले. त्यानंतर मुदत संपलेल्या खातेदारांचे पैसे परत मिळत नसल्याने सहा महिलांनी कंपनीचा प्रमुख शिवाजीराव जाधव यांना भेटायला गेल्या. तेथे जाऊनही ते भेटले नाहीत. भरलेली रक्कम परत केलेली नाही. तक्रारीनुसार शिवाजीराव जाधव यांच्यावर तळबीड पोलिस ठाण्यात फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.