वाई | येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक नंदकुमार खामकर व संचालक वजीर शेख यांच्यासह 29 जणांनी संगनमताने 112 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्जप्रकरणे दाखवून, तसेच बांधकाम केलेले सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून बॅंकेतून संबंधीताचे नावे कर्ज घेवून बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोग व अपहार करुन बॅकेच्या सभासदाची व ठेवीदारांची एकूण रक्कम 37 कोटी 46 लाख 89 हजार 344 रूपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार जिल्हा विशेष लेखा परीक्षक ,सहकारी संस्था सातारा, विजय दत्तात्रय सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, रोखपाल आणि तीन सनदी लेखापाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
वाई शहरातील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित गुलाबराव खामकर, उपाध्यक्ष जगन्नाथ बाजीराव सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर ,संस्थापक संचालक वजीर कासमभाई शेख, संचालक मनोज श्रीधर खटावकर,प्रकाश केरबा ओतारी, विलास गणपत खामकर,चंद्रकांत धर्माजी शिंदे, विष्णुपंत शंकर खरे,अर्जुन दिगंबर खामकर, जनार्दन आनंदा वैराट,किरण भास्कर कदम, जयश्री वसंत चौधरी, जयमाला विजय खामकर, गोविंद तुकाराम लंगडे तज्ञ संचालक,अरुण महादेव केळकर तज्ञ संचालक,एड. संतोष शिवाजी चोरगे तज्ञ संचालक,व्यवस्थापक रमेश दगडू जाधव, शाखा प्रमुख विनोद मनोहर शिंदे(वाई) रणजीत खाशाबा शिर्के (खंडाळा), सुनिल चंद्रकांत पंजारी ( वडूथ)वसंत आनंदा सणस (भुईज), रोखपाल सुचित महादेव जाधव (वाई) ,महेश प्रताप शिंदे (वडूथ) दिपक धर्माजी शिर्के (भुईंज) ,२६) श्री तानाजी मानसिंग भोसले (खंडाळा) सनदी लेखापाल राहुल धोंगडे, डी.बी.खरात,एन.एस.कदम इत्यादी यांनी हरिहरेश्वर डेव्हलपर्स वाई या फर्मचे नावे सोनगिरवाडी वाई येथील मिळकतीवर 62 कर्जदारांच्या नावे तसेच वजीर कासमनाई शेख यांनी एशियन डेव्हलपर्स या फर्मचे नावे ५० कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्ज प्रकरणे दाखवून तसेच सदरचे बांधकाम केलेले सदनिका कर्जदारांना दिलेचे दर्शवून बॅकेतून संबंधीतांच्या नावे कर्ज घेवून बँकेच्या सभासदांची व ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे. मागील अठरा महिन्यांपासून या बँकेचे व्यवहार ठप्प झाले असून ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळणे बंद झाले आहे.
काही ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर बँकेचे विशेष लेखापरीक्षण विशेष लेखा परीक्षक विजय दत्तात्रय सावंत यांनी मागील वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान करून अहवाल सादर केला होता. त्याप्रमाणे जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या पैकी अध्यक्ष अजित खामकर, संचालक वजीर शेख, विलास खामकर, जनार्दन वैराट, गोविंद लंगडे, अरुण केळकर हे सहा मयत असून अन्य सर्व संशयित फरारी आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.