साताऱ्यात रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पती- पत्नीवर गुन्हा

remedicivir injection
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत विक्रीसाठी घेऊन जाताना आढळून आलेल्या पती- पत्नीवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संबंधित दोघे शहरातील असून, त्यांच्याकडून दोन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा पती हा समर्थ हाॅस्पीटलमधील कर्मचारी असल्याची माहीती समजत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेस मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले व एक पथक सातारा शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी शहरातील समर्थ मंदिर परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी करण्यास सुरुवात केली.

तेव्हा प्रशांत दिनकर सावंत (वय २९) आणि सपना प्रशांत सावंत (वय २५, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) हे दोघेजण विना परवाना व मूळ विक्री किमतीपेक्षा अधिक दराने देण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन जाताना आढळले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांना बोलवून पुढील कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शन व दुचाकी असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, जयवंत खांडके, अश्विनी बनसोडे, तेजल कदम, सुमित मोरे, नीलेश बच्छाव, अनिकेत अहिवळे, राहुल वायदंडे आदी सहभागी झाले होते.