औरंगाबाद – नगरपरिषद हद्दीत येत नसतानाही संगणमत करून जायकवाडी धरण परिसरातील ईदगाह मैदानात सिमेंट रस्ते व इतर विकास कामे करून 39 लाख रुपयांचा निधी लाटल्या प्रकरणी तत्कालीन नगर परिषदेचे मुख्याधिकारी, अभियंते यांच्यासह नगरसेवक व ठेकेदार विरोधात पैठण न्यायालयाच्या आदेशानुसार पाच जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सन 2018-19 मध्ये आपसात संगणमत करून पैठण शहरात जायकवाडी धरणाच्या बाजूला असणारे ईदगाह मैदान पैठण नगर परिषदेच्या हद्दीत येत नसताना देखील पैठण नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये असल्याचे दाखवून त्या ठिकाणी सीसी रस्ता बांधकाम करण्याचे प्रस्ताव सादर केले. आपसात संगणमत करून काम पूर्ण केल्याचे दाखवून 39 लाख 59 हजार 489 रुपयांचे बिल बनवून आपसात वाटून घेतले. या प्रकरणी शासनाची आणि जनतेची फसवणूक केली म्हणून तक्रारदार अब्रार गुलाब कुरेशी यांनी याबाबत पैठण न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, स्थापत्य अभियंता सचिन वाघमारे, अभियंता अमित सोनवणे, चारणीया कन्स्त्रक्शन औरंगाबड आणि नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्यावर काल रात्री उशिरा पैठण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रामकृष्ण सागडे, चव्हाण हे करत आहेत.