देशमुखनगर येथील अवैध दारू प्रकरणी कराडच्या प्रणव वाईन शाॅपच्या एकासह दोघांवर गुन्हा

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सातारा | सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथे मुख्य चौकात बिगर परवाना 13 देशी दारू बॉक्सची वाहतूक करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संशयिताने कराडजवळील पाचवड फाटा येथील प्रणव वाईन शॉप मधून दारूसाठा आणल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर गुलाब मुलाणी (रा. देशमुखनगर, ता. सातारा) व कराड येथील वाईन शॉपच्या उमेश चंदवानी (रा. लाहोटीनगर, मलकापूर कराड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, देशमुखनगर येथे दारूची चोरटी विक्री होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने रविवारी दुपारी सापळा लावला.पोलिसांनी महामार्गावर वॉच ठेवला असता नांदगाव बाजूकडून देशमुखनगर दिशेने येणारी सिल्व्हर रंगाची कार (एमएच-04 सीबी 0906) दिसली. पोलिसांनी कार थांबवल्यानंतर त्यामध्ये पाहणी केली असता दारूचे बॉक्स होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यामध्ये 38 हजार रुपये किमतीचे देशी दारूचे 13 बॉक्स होते.

पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन दारू कारसह जप्त केली. मुद्देमाल व संशयिताला बोरगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रणव वाइन शॉपमधून दारूचे बॉक्स आणल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल केला. जप्त केलेली दारू, कार असा सर्व मिळून 1 लाख 37 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, सहायक फौजदार उत्तम दबडे, पोलीस हवालदार अतिश घाडगे, कांतीलाल नवघणे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, नीलेेश काटकर, मुनीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रमोद सावंत आदींनी भाग घेतला.