औरंगाबाद : लासूर स्टेशन येथून चोरी केलेली दुचाकी तीन महिन्यांपासून वापरत असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास तीसगाव चौफुली येथे करण्यात आली.
अप्पासाहेब विठ्ठल राऊत (३५, शहापूर घोडेगाव, 19 ता. गंगापूर) असे दुचाकी चोराचे नाव असून तो चोरीच्या दुचाकीवर बनावट ई क्रमांक टाकुन वापरत असल्याचे समोर आले होते. लासूर स्टेशन येथून अप्पासाहेब राऊत हा दुचाकी चोरून ती गेल्या तीन महिन्यांपासून वापरत होता. तसेच पोलीस पकडण्याची भिती वाटत असल्यामुळे त्याने दुचाकीचा क्रमांक बदलला होता. त्याच दरम्यान बुधवारी शाखेचे जमादार शेख हबीब, विजय निकम आणि पोलीस नाईक राजेंद्र साळुंके हे गस्तीवर असताना त्यांनी संशयावरुन अप्पासाहेब राऊतला थांबवले.
त्याच्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, ही दुचाकी नातेवाईकाच्या नावावर आहे अशी उडवा उडविची उत्तरं त्याने दिली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीवरील क्रमांक चेक केला असता तो क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. त्यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी अप्पासाहेब राऊतला एमआयडीसी वाळुज पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र साळुंके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.